खळबळजनक वृत्ताच्या मोहापायी माहितीचा स्त्रोत मोठी किंमत देऊन विकत घेण्याच्या प्रवृत्तीला ‘चेकबुक जर्नालझिम’ म्हटले जाते. पैसे टाकून माहिती विकत घेणे आणि हीच माहिती पुन्हा दामदुपटीने लोकांना विकणे असा हा खरेदी-विक्रीचा उद्योग आहे. मुख्य प्रवाहातील पत्रकारितेने या हातचलाखीला कधीच थारा दिला नाही.*
माहितीचा स्त्रोत पक्का असणं, ही पत्रकारितेची पूर्वअट आहे. वस्तुनिष्ठ माहितीवरच पत्रकारितेचा संपूर्ण डोलारा उभा आहे. पत्रकारांना विविध स्त्रोतांकडून माहिती मिळते. हे माहितीचे स्त्रोत जितके विश्वासार्ह तेवढी संबंधित पत्रकाराची विश्वासार्हता जास्त. म्हणजेच पत्रकारितेची गरिमा स्त्रोतांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक पत्रकार आपापल्या स्त्रोतांना जपत असतो. व्यक्तीगत संबंधांवर आणि कौशल्य पणाला लावून पत्रकार माहिती गोळा करत असता. परस्पर विश्वास आणि स्नेहभाव जपण्यातून पत्रकारांना विविध स्त्रोतांकडून महत्त्वाची माहिती मिळत आली आहे. परंतु युरोपातील काही देश किंवा ब्रिटनसारख्या देशात माहितीच्या स्त्रोतांना खरेदी करण्याचे प्रकार होतात. यामध्ये पत्रकार आपल्याला हवी ती माहिती खरेदी करतात. वृत्तसंस्था किंवा माध्यम संस्था धोरणाचा भाग म्हणून माहितीसाठी प्रचंड मोठी किंमत मोजतात. संबंधित स्त्रोताला माहितीच्या बदल्यात मोठी रक्कम दिली जाते. या प्रकारच्या पत्रकारितेला ‘चेकबुक जर्नालझिम’ म्हटले जाते.
पत्रकारितेत माहिती मिळविणे मोठे कौशल्याचे काम मानले जाते. पत्रकार सातत्याने माहितीचे उत्खणन करत असतात. या खोदकामातून त्यांना सत्य किंवा सत्याच्या जवळपास जाणारी माहिती मिळते. ज्यांनीकुणी पत्रकारांना माहिती दिली, त्यांचे नाव गोपनीय ठेऊन पत्रकार आपल्या स्त्रोतांच्या गोपनीयतेचा आदर करतात. मात्र ब्रिटन, फ्रान्स किंवा युरोपातील अन्य काही देशांत माहिती विकत घेतली जाते. विविध माध्यमांतून सनसनाटी निर्माण करण्यासाठी स्फोटक मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात. यासाठी संंंंबंधित मुलाखत देणार्या सेलिब्रेटींना भरघोस रक्कम दिली जाते. अनेकवेळा गुन्हेगारी वृत्तांशी निगडीत माहिती संकलित करण्यासाठी पत्रकार संबंधित स्त्रोतांना पैसे देतात. यातून खळबळजनक वृत्त पैदा करून लोकांचे माध्यमांकडे लक्ष वेधले जाते.
ब्रिटनमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या बेबीच्या पालकाच्या मुलाखती घेण्यासाठी बोली लागली होती. सर्वाधिक किंमत जे माध्यम देईल, त्याला या पालक, डॉक्टर आणि रूग्णालयातील कर्मचार्यांची मुलाखत मिळणार होती. ‘डेली मेल’ने सहा लाख डॉलर देऊन या मुलाखती प्रसिद्ध केल्या. बिल क्लिंटन, मोनिका लेवेन्स्की, मायकल जॅक्सन, प्रिन्सेस डायना अशी ‘चेकबुक जर्नालिझम’ची कितीतरी उदाहरणे देता येतील. प्रसिद्ध राजकीय व्यक्ती किंवा सेलिब्रेटींशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी माध्यम संस्थांनी लाखो डॉलर खर्च केले आहेत. माहितीचा स्त्रोतच विकत घेण्यावर त्यांचा भर राहिला आहे. सर्व हक्कांसह माहिती विकत घेतल्याने ही माहिती केवळ त्याच माध्यमाकडे राहते. ही माहिती विकून माध्यमे अनेकपट रक्कम मिळवितात. म्हणजे हा एक प्रकारचा खरेदी-विक्रीचा उद्योग आहे. आधी स्त्रोतांना पैसे देऊन माहिती विकत घ्यायची आणि तीच माहिती माध्यमांद्वारे लोकांना विकायची, अशी ही हातचलाखी आहे. मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमांनी कधीच ही प्रवृत्ती स्वीकारली नाही. किंबहुना जागतिक पातळीवरील गंभीर पत्रकारिता करणारी माध्यमे आणि पत्रकारांच्या संघटनांनीही अशा पत्रकारितेचे उदात्तीकरण केले नाही. त्यामुळे अनैतिक कृत्याच्या यादीतच अशी पत्रकारिता कायम राहिली.
पत्रकारितेत माहितीच्या स्त्रोतांचे पावित्र्य जपण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. परंतु पैशाच्या लोभापायी कोण माहिती देणार असेल तर त्याच्या हेतूवर शंका घ्यायला जागा आहे. पैशाच्या बदल्यात मिळणारी माहिती तटस्थ असेल, अशी अपेक्षा गैर आहे. लाभाचे मुद्दे आले की पत्रकारितेचा कस कमी होतो. तिची पतही धोक्यात येते. म्हणून ‘पैसा फेको, तमाशा देखो’ या सूत्रावर बेतलेले ‘चेकबुक जर्नालिझम’ कधीच पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकले नाही.