छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नालिझम) हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. शब्दांविना प्रभावी संवादाचे हे महत्त्वपूर्ण साधन आहे. एाक छायाचित्र दहा हजार शब्दांपेक्षाही खूप काही सांगत असते. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात . सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते. मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात.छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात. प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते “एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय”.घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते.
छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात. पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी / दृष्टिकोन / कथा / माहिती देतो. म्हणूनच, छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे, परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो. फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे.
जगभरात गाजलेली काही छायाचित्रे
कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो. छायाचित्रकला ही एक कला नव्हेच , असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे. एखादे दृश्य निवडायचे, चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा, यात कला कुठे आहे? ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे; परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला.
“महायुद्धातले अनेक फोटो पाहिले; पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते. हिटलरच्या छळ छावण्यांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. जागोजागी पडलेले हाडांचे खच हिटलर किती क्रूर होता याची साक्ष देतात. हिटलरमुळे सारे जग युध्दाच्या खाईत लोटले गेले. सोबतचे छायाचित्र छळछवणीतले नसून इंगलंडमधले आहे. जर्मन सैन्याच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये अनाथ आणि बेघर झालेली तीन लहान मुले यात दिसतात. सप्टेंबर 1940 मधले हे छायाचित्र आहे. खेळण्या – बागडण्याच्या वयात या मुलांवर भीषण संकट कोसळले आहे. ज्याची काहीही चुकी नाही अशी ही मुले एका हुकूमशहांच्या सत्ताकांक्षेमुळे आपले सर्वस्व गमावून बसली आहेत.
जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वात मोठी दुर्घटना म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल अशी भोपाळ वायू दुर्घटना 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे घडली . मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या आणि तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या भोपाळ शहरातील लोक डिसेंबरच्या गुलाबी थंडीत साखरझोपेत होते. अशावेळी अचानक युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून विषारी वायूच्या गळती सुरु झाली . या वायुगळतीने हजारोंचा जीव घेतला. त्या घटनेचे प्रतीक असलेले एक छायाचित्र खूप मन हेलावणारे आहे. दुर्घटनेत बळी पडलेल्या एका बालकाला जमिनीत गाडले जात असतानाचे हे दृष्य आहे. आजही या दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळालेला नाही . 3 डिसेंबरचा तो काळा दिवस कायम मनावर कोरला गेला आहे.
अफगाण –पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या. 1984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण-पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या .नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत. त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले.मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे : “मी या तरूणीला शोधले. ती फक्त बारा वर्षांची होती. ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती, कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता. काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला – तिच्या डोळ्यातील प्रकाश, पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती. यामुळे छायाचित्र अजरामर झाले. ” विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले.हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते. नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले. नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले. दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्र पत्रकार केव्हिन कार्टर यांनी 1993 मध्ये दक्षिण सुदानमधील दुष्काळात उपासमार झालेल्यांची काही छायाचित्रे काढली. त्यातील एका छायाचित्रासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. या छायाचित्रात कुपोषणामुळे मरणासन्न अवस्थेत बसलेली एक छोटी मुलगी दिसते. ती मेल्यानंतर तिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी वाट पाहणारे एक गिधाड तिच्यामागे बसलेले असल्याचेही छायाचित्रात दिसते. त्या मुलीला मदत का केली नाही अशी टीका केव्हीनवर जगभरातून झाली त्यामुळे निराश झालेल्या केव्हीनने तीन महिन्यानंतर त्याने आत्महत्या केली.
एकविसाव्या शतकात निर्वासितांचे लोंढे ही एक गंभीर समस्या बनली आहे. आपल्याच मायभूमीत अंतर्गत यादवी होते तेव्हा आपलीच मायभूमी परकी होते. अंतर्गत यादवीमुळे लोक संकटात सापडतात . लहान मुले, महिला, पुरुष सारेच जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने निर्वासितांचे लोंढे सुरक्षित देशात आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करतात.
सिरीयातील अशाच यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्यांच्या आयलान या मुलाचा मृत्यू झाला. अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे. निर्वासितांच्या अशा अनेक कहाण्या आहेत, असे अनेक आयलाान यात बळी पडले आहेत.