भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, जलतज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ म्हणून ओळखतो, मात्र आधुनिक भारत घडवणारे महान पत्रकार अशी त्यांची ओळख फार थोडया लोकांना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक क्षेत्रात कार्य करण्याआधी पत्रकारितेला सुरुवात केली हे महत्वाचे आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे त्यांनी सुरु करुन, ती वृत्तपत्रे मानवमुक्तीचा संदेश देण्यासाठी निष्ठापूर्वक चालविली. त्यांनी 1920 ते 1956 म्हणजे तब्बल 36 वर्षाची वर्षे पत्रकारिता केली आणि भारतीय समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1912 साली मुंबईच्या एलफिस्टन महाविदयालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते बडोदा संस्थानात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरीत रुजू झाले. 1913 साली ते अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल झाले आणि 1915 साली तेथून एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. जून 1916 मध्ये त्यांनी कोलंबिया विदयापीठातूनच पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम.एस्सी. इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेण्यास गेले, मात्र महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना भारतात परतावे लागले. नोव्हेंबर 1918 पासून ते मुंबई येथे सिडनहॅम महाविदयालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1919 मध्ये इंग्रज सरकारने नेमलेल्या साऊथबरो कमिशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागास जातींसाठी राखीव जागांची व राखीव मतदार संघाची मागणी केली.
‘मूकनायक’ ची सुरुवात
अमेरिका आणि इंग्लंडमध्ये शिकत असताना तसेच भारतात वृत्तपत्रांचा जनतेवर पडणारा प्रभाव डॉ. आंबेडकरांनी पाहिला होता. त्यामुळेच शतकानुशतके मूक राहिलेल्या अन्यायग्रस्त समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘मूकनायक’ वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 31 जानेवारी 1920 रोजी ‘ मूकनायक’चा पहिला अंक निघाला, हे वृत्तपत्र पाक्षिक स्वरुपात निघत असे. त्यातील पहिल्या अग्रलेखात त्यांनी लिहिले होते की “बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांची ख-या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाहीच”.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ वृत्तपत्राच्या अग्रभागी संत तुकारामांच्या अभंगातील
“काय करू आता धरूनिया भीड
नि:शंक हे तोंड वाजविले
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जाण
सार्थक लाजून नव्हे हित”
या ओळी ब्रीदवाक्य म्हणून ठेवल्या होत्या. यावरुन यापुढच्या काळात संघर्षासाठी सिध्द व्हावे लागेल हा संदेश त्यांनी दिला.
वंचित समाजाला आपल्यावर होणा-या अन्यायाची जाणीव करुन देण्यात ‘मूकनायक’ वृत्तपत्र यशस्वी झाले. आंबेडकरी विचारधारा सुरु करण्याचे आणि ती विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘मूकनायक’ ने केले. “प्रत्येक नागरिकास वैयक्तिक स्वातंत्र्य, वैयक्तिक संरक्षण, खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क, कायदयाच्या बाबतीत समता, सदसदविवेक बुध्दीला अनुसरुन वागण्याची मोकळीक, भाषण व मतस्वातंत्र्य, सभा भरविण्याचा हक्क, देशाच्या कारभारात प्रतिनिधी पाठविण्याचा हक्क आणि नोकरी मिळविण्याचा हक्क” हे नऊ मूलभूत मानवी हक्क असायलाच हवेत, मात्र बहिष्कृत समाजाला हे हक्क नाकारले जातात ही बाब डॉ. आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ मधून 1920 सालीच व्यक्त केली होती.
वंचितांचा आवाज बुलंद करण्याचे महत्वपूर्ण कार्य ‘मूकनायक’ ने केले. शतकानुशतके मूक असलेल्या समाजाच्या भावना व्यक्त करणा-या सामाजिक पत्रकारितेची सुरुवातही डॉ. आंबेडकर यांनीच केली. तीन वर्षै अखंडपणे ‘मूकनायक’ वृत्तपत्र चालविल्यानंतर डॉ. आंबेडकर यांना राहिलेले उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अपरोक्ष अनुयायांना हे वृत्तपत्र नीटपणे चालविता आले नाही, अखेरीस 9 एप्रिल 1923 रोजी ‘मूकनायक’ बंद पडले. मात्र बहिष्कृत वर्गाला विषमतावादी व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवून, उन्नतीसाठी प्रवृत्त करण्याचे कार्य ‘मूकनायक’ ने केले हे मूकनायक वैशिष्ट्य आहे.
बहिष्कृत भारत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांना गुरुस्थानी मानत असत. इंग्लंडमधून पीएच.डी.चे शिक्षण घेऊन एप्रिल 1923 मध्ये भारतात परतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली ‘बहिष्कृत हितकारणी’ सभा नावाची संस्था काढून सार्वजनिक क्षेत्रातील कार्याला प्रारंभ केला. याच बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे 3 एप्रिल 1927 रोजी ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्राची सुरुवात त्यांनी केली. ‘बहिष्कृत भारत’ हे डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीचे मुखपत्र असे या वृत्तपत्राचे स्वरुप होते. या पत्रावर ब्रीदवाक्य म्हणून त्यांनी ज्ञानेश्वराची एक ओवी घेतली होती. ती अशी
आपल्याच स्वकीयांसमवेत कसे लढू? असा प्रश्न पडलेल्या अर्जुनाला कृष्णाने उपदेश केला होता की. आता तुला लढावेच लागेल. तसाच उपदेश डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाला या वृत्तपत्रातून केला.
‘बहिष्कृत भारत’ च्या पहिल्या अंकामध्ये लिहिलेल्या ‘पुनश्च हरिओम’ हे शीर्षक असलेल्या अग्रलेखात डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते “ 1930 साली कायदयाची दुरुस्ती होऊन इंग्रज सरकार हिंदी लोकांच्या हाती सत्ता देतील असा अंदाज आहे. त्यावेळी बहिष्कृत वर्गास त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले नाहीतर उन्नतीची इतिश्री होईल, म्हणून आजपासूनच चळवळीस सुरुवात व्हायला हवी”.
इंग्रजांनी देऊ केलेली मोठी नोकरी ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रासाठी डॉ. आंबेडकर यांनी नाकारली. ‘बहिष्कृत भारत’ मध्ये त्यांनी 33 अग्रलेख आणि 145 स्फूट लेख लिहिले. त्यामध्ये त्यांनी भारतीय जातीव्यवस्थेच्या मनोरा कसा आहे याची मांडणी केली. ‘बहिष्कृत भारत’मुळेच समाजसुधारक पत्रकार, सामाजिक चळवळीचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख जनतेला झाली. यात कालखंडात महाडचा सत्याग्रह झाला आणि तेथून त्यांच्या सामाजिक चळवळीने खऱ्या अर्थाने जोर धरला. या कालखंडात भाला वृत्तपत्राचे संपादक भोपटकर आणि इतर काही सनातनी पत्रकारांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवरुन विखारी टीका केली. मात्र डॉ. आंबेडकरांनी त्याला संयमाने उत्तरे दिली. महाडच्या तळयात उतरलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांना धर्मवादयांनी मारहाण केली. यासंदर्भात अतिशय समतोल व संयमी भूमिका मांडताना डॉ. आंबेडकर यांनी लिहिले की “आम्ही मारामारी या दृष्टीने पाणी प्रकरणाकडे मुळीच पाहात नाही. आम्ही त्यास समतेच्या तत्वासाठी मांडलेल्या धर्मयुध्दतील हे पहिले रणकंदन आहे असे समजतो”.
‘बहिष्कृत भारत’सुरु होते त्या कालखंडात डॉ.आंबेडकर यांनी आपल्या परिवर्तनाच्या लढयाची दिशा निश्चित केली. “आम्हाला समाजात समान हक्क हवेत आणि ते शक्यतोवर हिंदू समाजात राहून आणि जरुर तर कवडीमोल ठरलेल्या हिंदुत्वावर लाथ मारुन मिळविणार आहो” अशी रोकठोक भूमिका डॉ.आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’च्या 3 एप्रिल 1927 च्या अंकात मांडली. “बहिष्कृत वर्ग शेणामेणाचा नाही, त्याने रणांगणात मर्दुमकी गाजविली आहे, आमच्या पाठी जो सडकील त्यांची आम्ही टाळकी सडकू” असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता.
“आमचे मागणे न्याय्य असतानाही, मनगटाच्या जोरावर आहे तसे आणखी काही दिवस चालू दया; असे बेशरमपणे पुन्हा आम्हास सांगावे की काही ठीक नाही. कोणी काहीही म्हणो, पण हा अन्याय एक दिवसही सहन करण्यास आम्ही तयार नाही, मग पिढया, दोन पिढयांची गोष्टच नको” असेही डॉ.आंबेडकर यांनी धर्मवादयांना स्पष्टपणे बजावले होते. खरोखरीच जर जातीभेदाच्या भिंती गाडायच्या असतील तर रोटीबेटी व्यवहार सुरु करा असा सल्ला डॉ. आंबेडकर यांनी दिला होता. सुधारणा फुकाफुकी होत नसतात, समाजात कोणती गोष्ट आपल्या उत्कर्षाच्या आड येते आहे हे प्रत्यक्ष कळावे लागते, ते करणे म्हणजेच समाजमन आपोआपच ते अडथळे दूर करण्यास प्रवृत्त होते अशी त्यांची भूमिका होती.
ऑक्टोबर 1929 मध्ये ल.ब. भोपटकर यांनी पर्वती येथील देवस्थानाच्या पंचांना पत्र लिहून देवस्थानाच्या आवारात स्पृश्यास्पृश्य भेदभाव करु नये अशी मागणी केली. नंतर वंचित समाजानेही ही मागणी केली. या मागणीस प्रतिसाद मिळत नाही असे दिसल्यावर वंचित समाजातील कार्यकर्त्यांनी शांततेत सत्याग्रह करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भोपटकर आणि त्यांच्या सहका-यांनी आमचा या सत्यागृहास पाठिंबा नाही असे जाहीर करुन आपला खरा चेहरा उघड केला. सत्यागृहाच्या वेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना कर्मठांच्या जमावाने मारहाण केली. भाला वृत्तपत्राचे संपादक भा. व. भोपटकर यांनी तर पर्वती सत्याग्रहाचा निषेध करण्यासाठी झालेल्या सनातन्यांच्या सभेत बहिष्कृत वर्गास देवळात प्रवेशास आणखी दोनशे वर्षे लागतील असे विधान केले. या सा-या प्रकारावर डॉ. आंबेडकर यांनी भोपटकर आणि कंपूच्या ढोंगीपणावर सडकून टीका केली. यांनी याविषयी लिहिले की “जे लोक आज आम्हास साधे माणुसकीचे हक्क देण्यास तयार नाहीत ते उदया स्वातंत्र्य मिळाल्यावर माणुसकीने वागतील यावर आमचा विश्वास नाही”.
बहिष्कृत समाजाला आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन, मोठया संघर्षासाठी सिध्द करण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्राव्दारे केले. हे वृत्तपत्र देखील आर्थिक अडचणींमुळे अखेरीस 15 नोव्हेंबर 1929 रोजी त्यांना बंद करावे लागले.
जनता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी ‘जनता’ हे आपले तिसरे वृत्तपत्र सुरू केले. केवळ पददलित समाजानेच नव्हे तर सर्वांनी हे वृत्तपत्र वाचावे हा या वृत्तपत्राचा उद्देश होता. या वृत्तपत्रात
‘गुलामाला तू गुलाम आहेस हे सांगा, म्हणजे तो बंड करून उठेल’
हे ब्रीदवाक्य लिहिण्यात आले होते.
1935 साली इंग्रजांनी केलेल्या कायदयामुळे ब्राम्हणेतर तसेच बहिष्कृत वर्गाच्या मनात सत्तेत वाटा मिळून समाजव्यवस्थेत बदल होईल असा आशा निर्माण झाली. याच काळात डॅा. आंबेडकर यांनी 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यास प्रारंभीच्या काळात चांगले यश मिळाले. मात्र जातीयवादी राजकारणाने पुन्हा निराशाच हाती आली.
डॉ. आंबेडकर यांनी त्यामुळे निक्षून सांगितले की “बहिष्कृत समाजास हिंदू धर्मातच राहावयाचे आहे, मात्र आम्हाला माणूस म्हणून हक्क दया, अन्यथा आम्ही या धर्मातून बाहेर पडू”. ‘जनता’ वृत्तपत्राच्या दिनांक 1 ऑगस्ट 1936 च्या अंकात डॉ. आंबेडकर यांनी बहिष्कृत समाजाने धर्मत्याग केल्यास त्याचे बहिष्कृत समाजावर कोणते परिणाम होतील याची चर्चा केली आहे. निधर्मी रहायचे ठरविले अथवा बौध्द, मुस्लिम , शीख, पारशी यापैकी एखादया धर्माचा स्वीकार केला, तर बहिष्कृत समाजाच्या राजकीय हक्कांवर काय परिणाम होऊ शकतात? याचे विवेचन त्यांनी यात केले. याच अग्रलेखात त्यांनी शेवटी इशारा दिला की “जेव्हा जेव्हा समाजातील सत्ताधारी लोकांनी आपल्या हातातील सत्ता आणि अधिकार यांची सत्ताहीनांबरोबर वाटणी करण्याचे नाकारले , त्या त्या वेळी क्रांती घडून आली आहे”.
जातिभेदाच्या संदर्भाने डॉ. आंबेडकर म्हटले होते “भारत हे खरे खरे राष्ट्र व्हायचे असेल तर जातिभेद काढावा लागेल. हजार जातिभेदांमुळे छिन्नविछिन्न झालेले लोक मिळून राष्ट्र कसे बनू शकेल?” ‘जनता’ च्या 17 मे 1941 रोजीच्या अंकात डॉ.आंबेडकर यांनी पुढे जाऊन भूमिका मांडली की
“लोकशाही हवी असेल तर चातुवर्ण्य नाहीसे झाले पाहिजे. चातुवर्ण्याचे जंतु काढून टाकण्याकरिता बुध्दाच्या तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही”.
“ इतर लो्कांप्रमाणे आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे. आम्हाला कोणाचीही परकीयांची किंवा स्वकियांची गुलामगिरी पत्कारायची नाही” ही भूमिका डॉ. आंबेडकर यांनी 27 जुलै 1946 च्या जनता च्या अंकात मांडली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही माझ्या जीवनाची आधारभूत तत्वे असून त्याचे बीज फ्रेंच राज्यक्रांतीत नाही तर बौद्ध धर्मात आहे असे डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. सर्व धर्मांच्या परीक्षणांती आपण बौध्द धर्माचा स्वीकार करण्याचा निर्धार केल्याची घोषणा डॉ. 20 ऑगस्ट 1955 च्या ‘जनता’ च्या अंकात केली. बौध्द धर्माचा स्वीकार केल्यावर शेडूल्ड कास्ट फेडरेशन हा जातीवाचक राजकीय पक्ष ठेवता येणार नाही हे ओळखून डॉ. आंबेडकर यांनी 1955 साली औरंगाबाद येथे जाहीर केले की “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा नवा राजकीय पक्ष स्थापन करायचा विचार आहे. भारतीय राज्यघटना ख-या अर्थाने राबविण्यास हा पक्ष असून पक्षाचे प्रमुख ध्येय समानता, स्वातंत्र्य व बंधुभाव राहणार आहे”. या अनुषंगाने 30 सप्टेंबर 1956 रोजी अ.भा. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली.
प्रबुध्द भारत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ वृत्तपत्राचे ‘प्रबुद्ध भारत ‘ असे नामांतर केले. ३ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर ‘प्रबुद्ध भारत’ हे त्या पक्षाचे मुखपत्र बनले. या वृत्तपत्राने चांगली कामगिरी करावी अशी डॉ.आंबेडकर यांची अपेक्षा होती. मात्र यानंतर काही अंकच त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघू शकले.
डॉ. आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षा भूमीवर बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर काही दिवसातच 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. नंतर ‘प्रबुध्द भारत’ साठी संपादक मंडळ नेमण्यात आले. संपादक म्हणून यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दा. ता. रुपवते, शंकरराव खरात व भा. द. कद्रेकर यांनी क्रमाक्रमाने जबाबदारी सांभाळली. 1961 साली हे वृत्तपत्र बंद पडले. मधल्या काळात काहीवेळा या वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला , मात्र तो यशस्वी ठरला नव्हता. 10 मे 2017 पासून ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या वृत्तपत्राचे प्रकाशन पुन्हा सुरु झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युगप्रवर्तक आणि परिवर्तनवादी पत्रकारिता केली. मात्र प्रस्थापित वर्गाने त्यांच्या पत्रकारितेची दखल घेणे टाळले. डॉ. आंबेडकरांनी मानवी जीवन उत्तम, उन्नत करणारे लेखन या वृत्तपत्रांच्या माध्यमातून केले. बहुजन वर्ग आणि शेतकऱ्यांच्या शोषणाचे चित्र या पत्रकारितेतून त्यांनी मांडले. त्याप्रमाणे स्त्रियांची अवनती कशी होत आहे, हे उलगडून दाखवण्याचे काम त्यांनी केले. गिरणी कामगारांचे वेतन आणि प्रश्न यावर त्यांनी वेळोवेळी भाष्य केले आहे. तर्कशुद्ध विचारसरणी आणि बिनतोड युक्तिवाद हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्टय होते. लेखणीव्दारे व्यक्त होणाऱ्या विचारातून क्रांती आणि परिवर्तन घडू शकते हे त्यांनी आपल्या पत्रकारितेतून सिद्ध केले.
समता ,बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर आधारलेली आणि मानवमुक्तीचा संदेश देणारी पत्रकारिता त्यांनी सातत्याने केली. आपल्या पत्रकारितेतून त्यांनी सतत अहिंसेचा पुरस्कार केला. विचारांनीच विचाराला उत्तर देणे ही कार्यपद्धती त्यांनी सतत अवलंबली. त्यांच्या विचारांची उंची प्रचंड होती, त्यात संकुचित विचारांना कधीही थारा दिला नाही. त्यांची पत्रकारिता ही नव्या भारताची संकल्पना मांडणारी निडर पत्रकारिता होती. अर्थकारण, शेती, जलव्यवस्थापन, शिक्षण, व्यापार, संरक्षण, सहकार, परराष्ट्रसंबंध, सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य या सर्व विषयांवर त्यांनी विविधांगी लेखन केले. डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधी जाहिरातींची अपेक्षा बाळगली नाही. जनहितासाठी आपण पत्रकारिता करतो आहोत हे भान त्यांनी सतत बाळगलेले होते, त्यामुळे आर्थिक नुकसान सोसून त्यांनी पत्रकारिता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता जेवढी आक्रमक होती, तेवढीच संयमी देखील होती.
भारतात अनेक समाजसुधारक निर्माण झाले, त्यांनी आपले विचार मांडले , मात्र त्यांच्या मागे त्यांच्या अनुयायांनी ते विचार जिवापाड जपल्याचे, जोपासल्याचे चित्र अभावानेच दिसते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणास 64 वर्षे झाली , तरीही डॉ. आंबेडकर यांनी दिलेली विचारधारा जोपासणा-यांची संख्या वाढतेच आहे. डॉ.आंबेडकर यांच्या विचारातील शक्ती, ताजेपणा कायम आहे. ज्या जातीअंताच्या लढयासाठी त्यांनी संघर्ष केला तो लढा मात्र अदयाप पूर्ण होऊ शकलेला नाही. जाती-धर्माच्या अस्मिता अधिक टोकदार होताना दिसत आहेत. जनतेला जाती-धर्माच्या जोखडात अडकवून आपल्या राजकारण करणारांची संख्या वाढली आहे. क्रांतीचे चाक अर्धेच फिरले आहे, ते पूर्ण फिरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दिलेली घटना या मार्गाने वाटचाल करणे हाच एकमेव मार्ग आहे.
—— डॉ. रवींद्र चिंचोलकर , विभाग प्रमुख पत्रकारिता विभाग ,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर
(मो – 98600 91855)