घडलेल्या घटनेची मोडतोड करून असत्य, अर्धसत्य किंवा सोईचे सत्य देण्यासाठी खटाटोप करणार्या पत्रकारितेला ‘स्पीन पत्रकारिता’ संबोधले जाते. आधुनिक राजकीय जनसंपर्कात राजकीय व्यक्ती, पक्ष किंवा विचारधारा आदींची प्रतिमानिर्मिती करण्यासाठी निष्णात असे ‘स्पीन डॉक्टर’ नियुक्त केले जात. आता त्यांची जागा पत्रकारितेत ‘स्पीन जर्नालिस्ट’नी घेतली आहे. यातून ‘स्पीन जर्नालिझम’ मूळ धरू पाहत आहे.
पत्रकारिता हा असा उद्योग आहे, ज्यामध्ये इतर उद्योग-व्यावसाय तसेच शासन-प्रशासनासह संपूर्ण व्यवस्थेची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य घेतले जाते. परंतु माध्यमांची चिकित्सा अपवादानेच होते. खरे तर व्यापक समाजरचनेचा प्रसार माध्यमे अविभाज्य आणि अपरिहार्य भाग आहेत. तथापि, माध्यम उद्योग किंवा पत्रकारिता व्यवसायातील चुकीच्या पद्धतीवर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी आवश्यक असणारे समाजमन अद्याप तितकेसे विकसित झालेले नाही. माध्यमांप्रती असेलेला कमालीचा आदर हे जसे त्याचे कारण असू शकते, तसेच माध्यमांकडे असलेले उपद्रवमूल्यही त्याचे आणखी एक कारण असू शकते. यामुळे सामाजिक स्तरावरून माध्यमांतील चुकीच्या पायंड्यावर बोट ठेवण्याचे धाडस कितपत होईल, याबद्दल शंका आहे. यासाठी स्वतः माध्यम संस्था, पत्रकार संघटना, स्वायत्त व्यवस्था आणि माध्यम शिक्षण संस्था आदींनी यावर गंभीर चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. लोकशाही व्यवस्थेत माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप असता कामा नये, हे जरी खरे असले तरी याचाच अर्थ माध्यमांनी स्वतःहून काही बंधने आणि मर्यादा आखून घेणे आवश्यक असते. भारतातील माध्यमांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून स्वतःवर अशा अनेक मर्यादा घालून घेतल्या आहेत. अत्यंत गांभीर्याने या मर्यादांचे पालनही काही माध्यमे सचोटीने करताना दिसतात. मात्र सर्वच माध्यमांच्या बाबतीत असे सरसकट विधान करणे रास्त होणार नाही.
आधुनिक राजकीय जनसंपर्कात ‘स्पीन डॉक्टर’ नावाची संकल्पना आहे. हे डॉक्टर्स संज्ञापनाची विविध साधने वापरून राजकीय ईप्सित साध्य करतात. राजकीय व्यक्ती, पक्ष, संघटना किंवा विचारधारा आदींच्या प्रतिमा निर्मितीसाठी यात जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. ज्या घटना घडल्या नाहीत, त्या घडल्या असे भासवून म्हणजेच घटना स्पीन करून माध्यमांचा वापर करत लोकांच्या मनात सदिच्छा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असतो. यासाठी निष्णात तितकाच कुशल संज्ञापक असणे आवश्यक आहे आणि अशा कारागिराला ‘स्पीन डॉक्टर’ असे संबोधले जाते. हाच प्रकार पत्रकारितेत आल्याने त्याला ‘स्पीन जर्नालिझम’ असे म्हटले जात आहे.
‘स्पीन जर्नालिझम’ मध्ये घटना जशाच्या तशा न देता त्यांची मोडतोड केली जाते. कोणाच्या तरी हिताचे रक्षण करण्याचा खटाटोप त्यामागे असतो. केवळ सोईचा आशय दिला जातो, आणि त्यातून हितसंबंधांची पाठराखण केली जाते. प्रत्येक वेळी राजकीय मुद्दाच असेल, असे नाही. सनसनाटी, असत्य, अर्धसत्य, सोईचे सत्य किंवा सत्याचा अपलाप करून माहिती सादर केली जाते. सत्य झाकून किंवा दडपून सत्याचा अभास निर्माण करण्याची खटपट या प्रकारच्या पत्रकारितेत केली जाते. जगभरातील माध्यमांत हे प्रयोग चालत आले आहेत. कार्पोरेट क्षेत्र नेहमीच आपले बस्तान बसविण्यासाठी तसेच आपल्या उद्योगाच्या अघोरी विस्तारासाठी माध्यमांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आले आहे. यासाठी प्रपोगंडा चालवणारी मोठी फौज कार्पोरेट विश्वाकडे तैनात असते. राजकारण्यांकडेही असे कित्येक ‘स्पीनर्स’ असतात. हे स्पीनर्स ‘कहानी में ट्विस्ट’ आणण्यात पटाईत असतात. अलिकडे या ‘स्पीन डॉक्टर’ची जागा माध्यम संस्थांतील पत्रकार घेताना दिसत आहेत. माध्यम संस्थाही या प्रक्रियेचा भाग बनत आहेत. हा केवळ नैतिकतेलाच नाही तर सत्यान्वेषी, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेलाही धक्का आबहे. माध्यमांविषयी आस्था आणि जिव्हाळा असणारे तसेच लोकशाही प्रक्रियेवर निष्ठा असणारे घटक निश्चितपणे यावर विचार करतील, यात शंका नाही.
- डॉ. शिवाजी जाधव,
- सहायक प्रााध्यापक, मास क्म्युनिकेशन विभाग, सिवाजी विदयापीठ , कोल्हापूर (पुढारी दैनिकात प्रसिध्द झालेला लेख)