News Updates

नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सोलापूर - विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा यंदा ८ जुलै 2018रोजी होणार आहे.  या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्या वतीने नेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. सीबीएसई बोर्डाच्या वतीने www.cbsenet.nic.in या वेबसाइटवर नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना ६ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीमध्ये www.cbsenet.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६०० रुपये, इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये, आणि एससी, एसटी व पीडब्ल्यूडी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १५० रुपये शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ६ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्तीसाठी वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर ८ जुलै रोजी विविध केंद्रांवर नेट परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असे सीबीएसईने जाहीर केले. 

ही परीक्षा पूर्वी 350 गुणांची होती. आता तीनशे गुणांची आणि तीनऐवजी दोन पेपर असतील. पहिला पेपर 50 प्रश्‍न आणि दुसरा पेपर 100 प्रश्‍न प्रत्येकी 2 गुण अशी 300 गुणांची परीक्षा होईल. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पहिल्या पेपरसाठी एक तासाचा अवधी असणार आहे; तर दुसऱ्यासाठी दोन तास वेळ असेल. याबाबतचे संक्षिप्त परिपत्रक "सीबीएसई'ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. "ज्युनिअर रिसर्च फेलोशिप'साठी वयाची अट 28 ऐवजी 30 वर्षांपर्यंत वाढविली आहे. 

परीक्षेचे बदललेले स्वरूप  असे आहे.पेपर एक (प्रश्‍न : 50), गुण : 100. ,वेळ : सकाळी 9.30 ते 10.30. .अभ्यासक्रम पूर्वीच्या पहिल्या पेपरनुसारच असणार आहे. सर्व विषयांसाठी पहिला पेपर एकच असेल. सर्व प्रश्‍न अनिवार्य असणार आहेत. पेपर दोन (प्रश्‍न : 100), गुण : 200. वेळ : सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडलेल्या विषयानुसार असेल. सर्व प्रश्‍न अनिवार्य असणार आहेत.

Related News