News Updates

लघुपट हे पर्यावरण संदेशाचे प्रभावी साधन

सोलापूर –  पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी लघुपट हे प्रभावी माध्यम आहे. इको रेंजर्सनी या माध्यमाचा सशक्तपणे वापर करावा असे आवाहन लघुपट निर्माता व दिग्दर्शक संदीप जाधव यांनी केले.

 किर्लोस्कर – वसुंधरा इको रेंजर उपक्रमांतर्गत दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज , सोलापूरच्या गुरुकुल सभागृहात  महाविदयालयीन व विदयापीठातील विदयार्थ्यांसाठी एक दिवसीय लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

किर्लोस्कर वसुंधरा पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या एक भाग म्हणून विदयार्थ्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात व पर्यावरण रक्षणात त्यांचा सतत कृतिशील सहभाग असावा या हेतूने किर्लोस्कर - वसुंधरा इको रेंजर्स संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री तसेच विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या संयुक्त विदयमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मंचावर कार्यशाळेतील मार्गदर्शक भाग्यश्री वठारे ( मुंबई) , डॉ. बाळासाहेब मागाडे, विदयापीठातील भूशास्त्र संकुलाचे डॉ. सुयोग बाविस्कर, वालचंद अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्रा. पृथ्वीराज तांबे, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजच्या सोलापूर युनिटचे व्यवस्थापक विलास खरात तसेच या एच.आर.विभागाचे व्यवस्थापक ऋषिकेश कुलकर्णी उपस्थित होते.

 इको रेंजर या उपक्रमात महाविदयालय व विदयापीठातील विदयार्थ्यांनी वर्षभर ‘ग्रीन कॉलेज - क्लीन कॉलेज’ ही संकल्पना घेऊन कार्य करावे. त्यानंतर पीपीटी अथवा माहितीपटाव्दारे सादरीकरण करावे. यात पहिल्या तीन ठरणा-या  संघास पारितोषिक देऊन गौरविले जाईल अशी योजना असल्याचे विलास खरात यांनी यावेळी बोलताना सांगितले. किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीने पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याची माहिती यावेळी ऋषिकेश कुलकर्णी यांनी दिली.

 या कार्यशाळेत भाग्यश्री वठारे यांनी ‘ पर्यावरण आणि आपण’ या विषयावर बोलताना सांगितले की आजच्या घडीला देशात प्रदूषण वाढत असल्याने चिंतेचा विषय बनत असल्याने ती सर्व सजीवांसाठी धोक्याची घंटा  आहे.  प्रदूषण कमी करणे, झाडे लावणे , प्लास्टीकचा वापर टाळणे हे यावरचे काही उपाय आपण अंगीकारले पाहिजेत.

या कार्यशाळेत संदीप जाधव यांनी लघुपट निर्मितीची प्रक्रिया कशी असते याविषयी सविस्तर माहिती दिली. कोणतेही कथानक हे जेव्हा मनापासून मांडले जाते तेव्हाच ते प्रभावी होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ बाळासाहेब मागाडे यांनी सांगितले की ज्या महाविदयालयात चित्रीकरणासाठी व्हिडिओ कॅमेरा सारखी साधने उपलब्ध नाहीत तेथे मोबाईलव्दारे चित्रीकरण व  संपादन करुन उत्तम दर्जाचे लघुपट व माहितीपट यांची निर्मिती करता येऊ शकते.

या कार्यक्रमास विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, नितीन शिंदे तसेच किर्लोस्कर फेरसचे सहव्यवस्थाक (एच.आर.) राघवेंद्र नागेल्लू, सुनील जमादार यांच्यासह विविध महाविदयालयाचे व विदयापीठ अधिविभागांचे विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related News