News Updates

अँकरिंग, माहितीपट निर्मिती अभ्यासक्रमाचे विदयापीठात उद्घाटन

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अँकरिंग तसेच लघुपट व माहितीपट निर्मिती अभ्यासक्रमाचे उद्घाटन दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी टेलिव्हिजन पत्रकार सोनाली शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. बी.घुटे होते.

याप्रसंगी मंचावर सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर, डॉ.अंबादास भासके ,प्रा तेजस्विनी कांबळे आदींची उपस्थिती होती.अँकरिंग या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचला प्रारंभ होत असून माहितीपट व लघुपट निर्मिती अभ्यासक्रमाची प्रथमच सुरुवात होत आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत अशी माहिती याप्रसंगी प्रास्ताविकात डॉ.जी एस कांबळे यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना सोनाली शिंदे म्हणाल्या की अँकरिंग करण्यासाठी सर्वप्रथम विषयाचे पुरसे ज्ञान आणि भाषेचे ज्ञान असले पाहिजे. अनुभवातून आणि सरावातून अँकरिंग चांगल्याप्रकारे जमू शकते, त्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. माहितीपट व लघुपट निर्माण करण्यासाठी प्रथम आपल्या मनात त्याची संपूर्ण कथा साकारावी लागते असेही शिंदे म्हणाल्या.

या प्रसंगी बोलताना कुलसचिव डॉ. घुटे म्हणाले की सामाजिक शास्त्र संकुलात विविध उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. या संकुलांत अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत.त्यात मास कम्युनिकेशन विभागाने सुरु केलेल्या या दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विद्यापीठाने कौशल्य विकास अभ्यासक्रमावर अधिक भर दिलेला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली ज्ञान मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी अनुराग सूतकर आणि रणदिवे या अँकरिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अभ्यासक्रमातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले आभार डॉ.अंबादास भासके यांनी मानले या कार्यक्रमानंतर अँकरिंग अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Related News